"मराठी आहे, मराठीतच बोलणार, नव वर्षाच्या शुभेच्छा गुढी पाडव्यालाच देणार" ,काहीशी अशीच होती यावेळी पाडव्याच्या कार्यक्रमाची कल्पना.
"गीर्वाण भाषा देवे केली, मग मराठी काय चोरापासोनी आणली?" संत ज्ञानेश्वरांचा हा भाबडा सवाल.
सहज, सुंदर आणि निखळ मराठी.
गोड मराठी, छाती ठोक मराठी.
मंडळाच्या या कार्यक्रमात मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे विविध पैलू उलगडले गेले आणि तिची समृद्धी प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यात सर्व सहभागी यशस्वी झाले.
बालकलाकारांनी सादर केलेली गणेश स्तुती, गावच्या मातीतलं गाणं, गवळण, लावणी, कोळी गीत, मराठी सिने नृत्य,बडबड गीत, निधड्या छातीचा मर्द मराठी पोवाडा आणि महिला मंडळाचा मराठी वर्षभराचा सण-उत्सवाचा देखावा (गुढी पाडवा ते रंगपंचमी) यांनी सर्वांना परत आपल्या मायभूमीत नेलं.कार्यक्रमाच्या शेवटी सादर केलेल्या दिंडीने तर सर्वांचे भान हरपले.कोणताही दुजाभाव न ठेवता या दिंडीने सर्व रसिकांना सामावून घेतलं आणि सार वातावरण भक्तिमय झालं.
मराठमोळ्या अप्रतिम सूत्र संचालनाने या कार्यक्रमावर साज चढवला. सदर कार्यक्रमाच्या यशास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीत्या कारणीभूत असलेल्या प्रत्येकाचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!!!
विशेष उल्लेखनीय म्हणजे यावर्षी शैक्षणिक व शिक्षणेतर उपक्रमात लक्षणीय कामगिरी केलेल्यांचा EXPAT PROPERTIES व मराठी मंडळाने जाहीर सत्कार केला.
|